कोल्हापूर प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रकाशित करण्यात आलेल्या ‘मोदी ट्वेंटी’ या पुस्तकाचे लेखक माधव भंडारी यांचे शुक्रवार दि.२३ सप्टेंबर रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभर सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्तानं संपूर्ण देशात विविध उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याच अनुषंगाने या व्याख्यान्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या जीवन चरित्रावर नुकतेच मोदी ट्वेंटी हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाचे लेखक आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते माधव भंडारी कोल्हापुरात उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तीमत्व, दुरदृष्टी, धोरण आणि यश या विषयी माधव भंडारी विस्तृतपणे बोलणार आहेत. केशवराव भोसले नाट्यगृहात शुक्रवारी सकाळी १० वाजता होणाऱ्या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांना मोफत प्रवेश आहे. शिवाय यानिमित्ताने पंतप्रधानांच्या जीवनपटावर आधारीत एका प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पेंढारकर कलादालनात हे प्रदर्शन दिवसभर खुले राहिल. तर त्याच वेळी व्होकल फॉर लोकल या योजनेअंतर्गत स्थानिक उत्पादनांचे स्टॉल्स उभारले जातील. ज्यामध्ये कोल्हापूरच्या वैशिष्टयपूर्ण उत्पादनांची मांडणी असेल. सर्व नागरिकांना ही उत्पादने खरेदी करता येतील, जेणेकरून स्थानिक कारागीर, व्यापारी आणि महिला बचत गटांनाही प्रोत्साहन मिळेल. तसेच सेवा पंधरवड्याचे औचित्य साधून, केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रांगणात खादी उत्पादनांच्या विक्रीचे काही स्टॉल्स असतील. शर्ट, कुर्ते, जाकीट यासह खादीच्या विविध उत्पादनांची या स्टॉल्समध्ये मांडणी केली असेल.