कोल्हापूर प्रतिनिधी : ग्राहक आणि सभासदांच्या विश्वासावर युथ बँकेची घौडदौड सुरु असुन त्यांच्या बळावरच बँक १०० कोटींच्या ठेवीचा टप्पा लवकरच पार करेल असा विश्वास डॉ.चेतन नरके यांनी व्यक्त केला. युथ डेव्हलपमेंट को-ऑप बँकेची ४६ वी सर्वसाधारण सभा कळंबा येथील अमृतधारा फार्म येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते. ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
पुढे डॉ.चेतन नरके यांनी बँकेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडत बँकेच्या उर्जितावस्थेत नवीन भाग भांडवल उभे करताना ग्राहक आणि सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानले. बँकेचा सी.आर.ए.आर. किमान ९% आवश्यक असताना तो १४.६९% इतका भक्कम झाला आहे.तसेच सलग तीन वर्षे निव्वळ एन.पी.ए. ०% असून बँकेला चालू आर्थिक वर्षात ४८ लाखांचा ढोबळ नफा झाल्याची माहिती यावेळी डॉ.नरके यांनी दिली. डिजिटल बँकिंग आणि एटीएम सुविधा देखील लवकरच सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अहवाल आणि नोटीस वाचन कार्यकारी संचालक रघुनाथ सूर्यवंशी यांनी केले. बँकेचे अध्यक्ष आर.पी.पाटील यांनी सर्व सभासदांचे आभार मानले.