मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील वेदान्त-फॉक्सकॉन हा मोठा प्रकल्प महाविकास आघाडीमुळे गुजरातमध्ये गेला अशी टीका सत्ताधाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात आता तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि राज्याचे विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत चर्चा खूप झाली. भाजपाच्या काही लोकांनी सांगितलं की मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत. ते जाणार असतील, तर त्यांनी वेदान्तच्या बाबतीत तरुण वर्गात, बेरोजगारांमध्ये पाहायला मिळत असलेली नाराजी दूर करण्यासाठी सर्वस्व पणाला लावून तो प्रकल्प महाराष्ट्रात परत आणावा. मध्यंतरीच्या काळात फारशी माहिती नसणाऱ्यांनी वेगळ्या प्रकारची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला”, असा दावा अजित पवारांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार असताना शेवटपर्यंत असे प्रकल्प महाराष्ट्रात यावेत, म्हणून प्रयत्न करण्यात आले. काही पक्षांचे लोक असंही म्हणत आहेत की कुणी काही वेगळ्या मागण्या केल्या म्हणून प्रकल्प राज्याबाहेर गेले का? मी उपमुख्यमंत्री म्हणून तेव्हा काम करत होतो. अजिबात असं काही झालेलं नाही. संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर कुणाला असं काही वाटत असेल, तर केंद्र-राज्य सरकार त्यांच्या हातात आहे. महत्त्वाच्या तपास यंत्रणा त्यांच्या हातात आहेत. त्यांनी चौकशी करावी. चौकशी करायची असेल तर चौकशी करू द्या. दूध का दूध, पानी का पानी होऊ द्या, असं आव्हानच अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना दिलं.