कोल्हापूर प्रतिनिधी : कागल तालुक्यातील नानीबाई चिखली व हमीदवाडा येथील भूखंड धारकांना स्व हक्काची मालकी पत्रे द्या, अशा सूचना आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या. यामुळे या दोन्ही गावातील भूखंड धारकांना ४० वर्षानंतर स्वः हक्काची मालकी पत्रे मिळणार आहेत.

१९८० साली नानीबाई चिखली व हमीदवाडा या दोन्ही गावातील भूमिहीन, गरजू व मागासवर्गीय कुटुंबीयांना घरांच्या बांधकामासाठी शासनाच्या वतीने भूखंड देण्यात आले होते. नानीबाई चिखली येथील ५५ भूखंडावर सत्ता प्रकार ब लागलेला आहे. हे भूखंड ग्रामस्थांच्या स्वरमालकीचे होण्यासाठी सत्ताप्रकार अ लागणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रेडीरेकनरच्या ६० % नुसार रक्कम भरून सत्ताप्रकार अ लावण्याच्या सूचना केल्या. हमिदवाडा येथील ४३ भूखंड धारकांना भूखंड मिळालेले आहेत. परंतु; मालकी पत्रामध्ये भूखंड धारकांची नावे नाहीत. ही भूखंड धारकांची नावे तातडीने लावण्याच्या सूचना आमदार मुश्रीफ यांनी केल्या.
आमदार हसन मुश्रीफ यांनी नगर भूमापन विभागाच्या अधिकाऱ्यांना या दोन्हीही गावातील भूखंडांची स्थळपाहणी करून व मोजमापे घेऊन तातडीने त्या -त्या संबंधितांच्या नावावर मालकीपत्रे करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या. येत्या तीन ते चार दिवसात ही सर्व कार्यवाही पूर्ण होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, राष्ट्रवादीचे कागल तालुकाध्यक्ष विकास पाटील, बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले, मनीबाई चिखलीचे माजी सरपंच मोहम्मद मुल्लाणी, महेश गळतगे, विक्रम गळतगे, हमीदवाडा येथील विलास जाधव, उमेश डावरे, कृष्णात बुरटे, सिद्राम पाटील, महेश पारळे, भगवान चोपडे, कुमार मोरबाळे, महादेव चव्हाण, रघुनाथ गुरव, संजय गंदुगडे आदी प्रमुखासह भूखंडधारक उपस्थित होते.