पुणे : “माहेरी फारशी राजकीय पार्श्वभूमी नसतानाही पुढे मी राजकारणात सक्रिय झाले. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली. त्या काळात केवळ रस्ते, पाणी, गटर्स या सर्व कामांबरोबरच एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण कामाची नोंद व्हावी, असे वाटत होते. ख्यातनाम लेखक `मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या जन्मगावी आजरा येथे जिल्हा परिषदेच्या वतीने सभागृहाच्या रुपाने त्यांचे स्मारक उभारता आले. तत्कालीन पालकमंत्री आणि विद्यमान उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या कामी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यांच्या या सहयोगामुळे आणि समीर देशपांडे यांनी माझ्याकडे ही कल्पना मांडून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच हे स्मारक उभारता आले, अशी कृतज्ञतेची भावना कोल्हापूर जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी येथे व्यक्त केली.

मृत्युंजय प्रतिष्ठान आणि शिवाजीराव सावंत स्मृती समितीच्या वतीने साहित्य आणि समाजकार्यविषयक पुरस्कार प्रदान सोहळा आणि शब्दशिवार या शिवाजीरावांच्या संकलित- संपादित पुस्तकाचे प्रकाशन असा संयुक्त कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सिक्कीमचे माजी राज्यपाल, खा. श्रीनिवास पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रतिष्ठानच्यावतीने कृतज्ञता म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शौमिका महाडिक तसेच समीर देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना सौ. महाडिक बोलत होत्या.
व्यासपीठावर प्रतिष्ठानचे संस्थापक-कार्यकारी विश्वस्त डॉ. सागर देशपांडे, श्रीमती मृणालीनी शिवाजीराव सावंत, अमिताभ सावंत, सह्याद्री प्रकाशनाच्या संचालक स्मिता देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खा. पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ कवयित्री सौ. आसावरी काकडे यांना मृत्युंजयकार साहित्य पुरस्काराने तर सांगोला (जि. सोलापूर) येथील माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या प्रमुख डॉ. संजीवनी केळकर यांना समाजकार्यविषयक पुरस्काराने गौरविण्यात आले.