कोल्हापूर प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा यांच्या वतीने सोमवार (दि.12 सप्टेंबर) रोजी ‘स्टार्ट अप’ आऊट रीच व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (डिएसटी) आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क (सायटेक पार्क) यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर, सांगली व सीमा भागातील उत्पादनशील स्टार्ट अपना प्रोत्साहन, मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती डी.वाय.पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता यांनी दिली.
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये सोमवारी दुपारी 3 वाजता या शिबिराला प्रारंभ होणार आहे. डी. वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असून जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे. सायटेक पार्कचे संचालक (एंटरप्रेनर एंगेजमेंट अँड ट्रेनिंग) हार्दिक जोशी व डिएसटीचे तज्ञ अधिकारी यावेळी स्टार्ट अपसाठीचे सीड फंडिंग तसेच गव्हर्मेंटच्या इतर महत्त्वपूर्ण योजना याबाबत माहिती देणार आहेत. योग्य ‘स्टार्ट अप’ना पुरस्कार स्वरूपात प्रोत्साहन देऊन या स्टार्टअपचा समाजासाठी जास्तीत जास्त कसा उपयोग करता येईल याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.
या शिबिरात उपस्थित नव उद्योजकांना प्रशिक्षण, मार्गदर्शन मिळणार असून त्यांना पुण्यातील नामांकित सायटेक पार्कच्या देशभरातील नेटवर्कचा उपयोग स्टार्ट अपसाठी होणार आहे. या शिबिरासाठी स्टार्टअपनी मोठा प्रतिसाद देऊन नोंदणी केली आहे. अजूनही या शिबिरामध्ये सहभागी घेण्यास इच्छुक असणाऱ्या नव उद्योजकांनी डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा येथे अधिष्ठाता, संशोधन विभाग यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांनी केले.