मुंबई वृत्तसंस्था : मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील इतर महानगरपालिका निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होणार असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुकीत बाजी मारण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात डोळ्यांसमोर ठेवून शिंदे फडणवीस सरकारची तयारी सुरू आहे.

गणेशोत्सवाचा योग जुळवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप आणि मनसेनं महापालिका निवडणुकीची एकीकडे तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे महानगरपालिकांचा रणसंग्राम दिवाळीनंतरच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपती दर्शनाच्या निमित्तानं वेगवेगळे नेते आणि त्यांच्याशी संबंधित मंडळांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. या दर्शनाच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळवण्याचा उद्देशही असल्याचं म्हटलं जातं. दुसरीकडे गणेश दर्शनाच्या निमित्तानं शिंदे गट, भाजप आणि मनसे यांच्यातली जवळीक वाढताना दिसत आहे.
नव्या राजकीय गणितांची जुळवाजुळव सुरु असताना महापालिका निवडणुका दिवाळीनंतरच घेण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा विचार असल्याची माहिती मिळत आहे. या निवडणुकांच्या आधी शिंदे गटाला शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह मिळावं यासाठी निवडणूक आयोग आणि न्यायालयात जोरदार प्रयत्न करावा लागणार आहे.