जिल्हा परिषदेकडे तब्बत एवढ्या मुर्तींचे संकलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाला जिल्ह्यातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.  या उपक्रमांतर्गत जवळपास २ लाख ५८  हजार ९३२ मुर्तींचे संकलन करण्यात आले. तर सुमारे ५१६ टन इतके निर्माल्य संकलन करण्यात जिल्हा परिषदेला यश मिळाले आहे. विशेषत: या उपक्रमांतर्गत १९८६ गणेशमुर्तींचे विजर्सन हे घरच्या घरीचं करण्यात आले.

पंचगंगा प्रदूषणमुक्ती तसेच जिल्हयातील जलस्त्रोत प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या हेतूने वर्ष २०१५ पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून यावर्षी ही जिल्हयातील सर्व गावांनी यामध्ये सहभाग घेवून उपक्रम यशस्वी केला. या उपक्रमामध्ये जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी होवून जलस्त्रोत प्रदूषण मुक्त ठेवण्याबाबतचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह यांनी केले होते.

या उपक्रमाबाबतच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा तसेच तालुकास्तरावर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बैठकांच्या माध्यमातून उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी तसेच जास्तीत जास्त लोकसहभाग मिळविण्यासाठी व ग्रामपंचायत स्तरावर पर्यायी व्यवस्थांची निर्मिती करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना समन्वयासाठी ग्रामपंचायती देण्यात आल्या होत्या. 

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी संजयसिंह चव्हाण, पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.या उपक्रमासाठी स्थानिक लोकप्रतिनीधी, स्वयंसेवी संस्था, तरूण मंडळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती आणि ग्राम पंचायत स्तरावरील अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. उपक्रमाचे आयोजन पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी केले.