आ. आबिटकर यांच्या प्रयत्नातून मधुमक्षिका पालक शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा

कडगांव (वार्ताहर) : आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने राधानगरी विधानसभा मतदार संघातील मधुमक्षिका पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तीन दिवसांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता.

गेल्या काही वर्षांपासून बळीराजा पारंपरिक शेतीसोबत आधुनिक शेती करण्यावर भर देत असून शेतीमध्ये विविध प्रयोग करत आहेत. आधी शेतीसह जोडव्यवसाय म्हणून शेतकरी फक्त पशुपालनाचा व्यवसाय करत असायचा आता मात्र पशुव्यवसायासह मत्स्य पालन, मधुमक्षिका पालन यासारखे शेती पुरक व्यवसाय करत आहेत. अशा मधुमक्षिका पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य माहिती व मधुमक्षिका पालनाचे फायदे कळावेत यासाठी मांघर, महाबळेश्वर, सेंट्रल मधुमक्षिका ट्रेनिंग रिसर्च इन्टींतट्युट, पुणे (CBRTI), बसवंत गार्डन, नाशीक, सह्याद्री ॲग्रो फार्म, नाशीक या ठिकाणी अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, राज्यातील विविध कृषि संशोधन केंद्र तसेच शेतीवर आधारीत उद्योगधंदे, प्रक्रिया केंद्र इत्यादींना भेटी घेऊन माहिती मिळविणे हा या सहलीचा उद्देश होता. प्रत्यक्ष प्रात्याक्षिकांच्या माध्यमातून जे नाविण्यपुर्ण उपक्रम राज्यामध्ये राबविले जातात त्यांची ओळख व्हावी व ते प्रत्येक शेतकऱ्यांनी अंगिकार करुन शेतीमध्ये अमुलाग्र बदल घडवून शेतकरी आर्थिकदृष्टया समृध्द व्हावे हा होता. यावेळी शेतकऱ्यांना मधमाशी पालनासाठी लागणारे साहित्य, मधुमाशांच्या प्रजाती, मधाच्या पोळ्यांची स्थापना, मधमाशांच्या वसाहतीची स्थापना, वसाहतींचे व्यवस्थापन, मधाची काढणी यासह मधमाशी पालनाचे फायदे आदी मार्गदर्शन करण्यात आले. या अभ्यास दौऱ्यामध्ये 50 हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

यावेळी जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी कुंरूंदवाडे, भुदरगडचे गटविकास अधिकारी भोकरे, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी संदेश जोशी, मंडळ कृषि अधिकारी भांडवले, कृषि पर्यवेक्षक आर. डी. पाटील, व्ही. डी. चव्हाण, कृषि सहाय्यक रणजित गोंधळी, ग्रामसेवक आर. एम. पाटील, पवन बोंगार्डे दौऱ्यामध्ये सहभागी झाले होते.