उंचगाव प्रतिनिधी : उंचगाव ता.करवीर येथील शासकीय योजनेच्या ४०० लाभार्थ्यांना पेन्शनचे वाटप करण्यात आले. येथील मंगेश्वर मंदिरात आयोजित कॅम्पद्वारे पेन्शन वाटप करण्यात आली. करवीर शिवसेना आणि करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या पुढाकाराने ‘बँक आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत १४ लाख इतकी रक्कम वाटप करण्यात आली.

संजय गांधी, श्रावण बाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी, आदी शासनाच्या योजनांद्वारे नागरिकांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा मार्केट यार्ड येथे पेन्शन दिली जाते. बँकेमध्ये जाण्यासाठी थेट बससेवा नसल्याने एक तर पायी चालत जावे लागते किंवा रिक्षा मधून जावे लागते. रिक्षाभाडे प्रत्येकी १०० ते २०० रुपये असल्याने आणि ते परवडण्यासारखे नसल्याने तसेच बँकेत गर्दी होत असल्याने पेन्शन धारक सकाळी पेन्शन आणण्यासाठी गेला की सायंकाळी ४ – ५ वाजताच घरी येतो.त्यामुळे पेन्शनधारकांची परवड होऊ नये व ‘बँक आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत कॅम्पद्वारे पेन्शन वाटप करण्यात आली.
यावेळी करवीर उपतालुकाप्रमुख विक्रम चौगुले, बाळासाहेब नलवडे, अजित चव्हाण,अजित पाटील, योगेश लोहार, केरबा माने तसेच बँकेचे कर्मचारी सुनिल केसरकर,मिलींद प्रभावळकर, विजया माने आदी उपस्थित होते.