विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण स्टार्ट अप सुरू करावेत : डॉ.पोवार

कसबा बावडा प्रतिनिधी : तंत्रज्ञानाचा वापर करून नावीन्यपूर्ण  स्टार्ट-अप विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच सुरू करावेत असे प्रतिपादन आयआयटी,मंडी, हिमाचल प्रदेश येथील असोसीएट प्रोफेसर डॉ. सत्वशील पोवार यांनी केले. कसबा बावडा येथील डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांना स्टार्टअप अँड इनोव्हेशन या विषयावर मार्गदर्शन करून त्यांच्याशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना डॉ.पोवार म्हणाले की , आपल्या अवतीभोवती असणाऱ्या गोष्टींकडे आणि घडणाऱ्या घटनांकडे बारीक लक्ष असणे आवश्यक असते. डोळसपणे आपण या गोष्टींकडे बघितले तर नक्कीच आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतील. यामधूनच आपल्याला लोकांना नेमकी कोणती अडचण आहे, आणि त्यातून नेमका काय उपाय काढावा हे  समजून येते. दरम्यान, डॉ. पोवार यांनी काही यशस्वी स्टार्ट अपची वाटचाल सांगितली. तसेच नवीन स्टार्ट अप सुरू केल्यावर तो कसा वाढवावा आणि कोणती काळजी घ्यावी याबाबत उदाहरणासह स्पष्टीकरण दिले.

यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी स्टार्ट अप ही काळाची गरज बनली असून याला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजना आहेत. पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यानी आपले प्रोजेक्ट करताना अशा स्टार्ट अपचा विचार डोळ्यासमोर ठेवावा असे सांगितले.

पॉलिटेक्निकचे माजी विद्यार्थी अमृत नरके, स्नेहल पाटील, गायत्री पाटोळे यांचा डीएक्ससी या कंपनी मध्ये कॅम्पस इंटरव्यूमधून निवड झाल्याबद्दल सत्कार डॉ.पोवार यांच्या हस्ते करण्यात आला. अमृत नरके याने माझ्या जडणघडीमध्ये डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकचा मोठा वाटा असल्याचे आवर्जून नमूद केले.

 यावेळी आयएसटी नवी दिल्ली संस्थेच्यावतीने  राष्ट्रीय स्तरावर युवा संशोधक  पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ.पोवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी  उपप्राचार्य मीनाक्षी पाटील, प्रा.महेश रेनके,  प्रा. अक्षय करपे, असिस्टंट रजिस्ट्रार प्रा.सचिन जडगे यांच्यासह विद्यार्थी आणि स्टाफ उपस्थित होते. स्वागत प्रा.असिफ पटेल यांनी केले तर प्रा. वृषाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले.