कागल (प्रतिनिधी) : महिलांना केवळ स्वावलंबीच नव्हे तर स्वाभिमानी सुद्धा बनवणार आहे, असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांनी केले.
येथील शाहू हॉलमध्ये राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्या वतीने आयोजित श्रावणी महोत्सव अंतर्गत महिला मेळाव्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दीडशेहून अधिक विधवा महिलांची ओटी भरणी करून त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
सौ घाटगे पुढे म्हणाल्या, राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. त्याचबरोबर कागलमध्ये जर महिलांचा कोणी अनादर करत असेल तर त्याला जशास तसे उत्तर देण्याची धमकसुद्धा कागलच्या महिलांमध्ये आहे. हेच महिलांनी एकसंघ भव्य मोर्चातून दाखवून दिले आहे.त्यासाठी महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, समाजात निम्म्या संख्येने महिला आहेत. मात्र त्यांना सर्वच बाबतीत गृहीत धरले जाते. हा समज मोडून काढण्यासाठी महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे. त्यासाठी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व पाठबळ देऊ. महिलांचा अनादर करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊन कागलच्या महिलांनी राजर्षी छत्रपती शाहू महराजांचा वारसा जपला आहे. कागदीच्या विकासात महिलांचे योगदान मोठे राहील, येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत महिलाच परिवर्तन करतील असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी नम्रता कुलकर्णी आपल्या मनोगतात म्हणाल्या, नवोदिता वहिनीसाहेब महिलांच्या सन्मानांसाठी अहोरात्र काम करत आहेत विधवा, परितक्त्या महिला भगिनींचा आज होणारा सन्मान हा कागल मध्ये प्रथम घडतो आहे. महिलासाठी व्यवसाय प्रशिक्षण, मेळावे, आरोग्य शिबीरे, यातून महिलांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत आपण त्यांच्या पाठीशी राहूया
यावेळी नगरसेविका विजया निंबाळकर,सुधा कदम, आनंदी पसारे, माणिक पिष्टे,शुभांगी भोसले,लक्ष्मीबाई सावंत,लता कांबळे,शीतल माने यांच्यासह राजमाता जिजाऊ महिला समितीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. स्वागत रेवती बरकाळे यांनी केले. आभार प्रतिभा गजबर यांनी मानले.
…आणि त्या माऊलींना गहिवरून आले
यावेळी सौ.घाटगे यांनी दीडशेहून अधिक विधवा महिलांची खणा-नारळाने ओटी भरून त्यांचा सन्मान केला.त्याच बरोबर स्नेहभोजन वेळी या महिलांना प्रथम मान दिला. इतकेच नव्हे तर समरजितसिंह घाटगे व सौ नवोदिता घाटगे यांनी या महिलांना जेवणही वाढले. त्यामुळे या विधवा माऊलींना गहिवरून आले.