कोल्हापूर : उंचगाव, चिंचवाड परिसरात जुन्या साड्यांचे गोदामे असून या साड्या रात्री-अपरात्री केमिकल च्या सहाय्याने नदीच्या पाण्यात धुलाई करून पाणी प्रदूषित करून, धुतलेल्या साड्या प्रेस करून प्रसिद्ध बाजारपेठेमध्ये दुकानात विक्रीसाठी ठेवून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टोळक्यांची चौकशी होऊन नदी प्रदूषित करणाऱ्या या टोळक्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीने कोल्हापूर निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना देण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यात घरोघरी फिरून जुन्या साड्यांच्या बदल्यात विविध वस्तू दिल्या जातात. जमा झालेल्या जुन्या साड्यांची गोडाऊन उंचगाव, चिंचवाड परिसरात असून त्या जुन्या साड्यांवर रासायनिक प्रक्रिया केली जाते. केंद्र व राज्य शासन पंचगंगा नदी प्रदूषण होऊ नये म्हणून कोट्यावधीचा निधी व उपायोजना, जनजागृती करत असताना काही समाजकंटक जुन्या साड्या केमिकलच्या साहाय्याने धूऊन पंचगंगा नदीच्या पाण्यामध्ये केमिकल मिसळले जात आहे. ह्या जुन्या साड्यांची गोदामे उंचगाव, चिंचवाड परिसरात आहेत. या साड्या काहीवेळा गोदामात केमिकलयुक्त पाण्यामध्ये धुतात व ते पाणी पंचगंगा नदीमध्ये मिसळले जाते काही वेळा रात्री-अपरात्री संबंधित समाजकंटक या साड्या केमिकलयुक्त पाण्याने नदीपात्रात धुत असतात त्यामुळे पंचगंगा नदीचे पाणी दूषित होत आहे. नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. दुसऱ्या बाजूला धूतलेल्या साड्या प्रेस करून पॅकिंगचे गट्टे करून प्रसिद्ध बाजारपेठेत दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवल्या जातात. ग्राहक नवीन साड्या समजून मोठ्या दराने त्याची खरेदी करत आहेत. त्यामुळे ग्राहकांची नाहक फसवणूक होत आहे. नदी प्रदूषण व ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या या टोळक्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. याबाबत संबंधित यंत्रणांना आपल्याकडून आदेश व्हावेत.
नदी प्रदूषण करणारी मंडळी शोधून काढणे प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच ग्राहकांची लूट करून फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचा बंदोबस्त करणे ही शासनाची जबाबदारी आहे. याबाबत योग्य ती चौकशी करून संबंधित घटकांवर कारवाई करण्यात यावी. तसे न झाल्यास करवीर शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल असा इशारा करवीर शिवसेनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला. यापूर्वीही करवीर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनाही यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडून कोणतीही कारवाई झाली नाही.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके साहेब यांनी याची माहिती घेऊन प्रदूषण नियंत्रण महामंडळाला कळवून नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर योग्य ती कारवाई करू असे आश्वासन शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव,कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, मा. उपतालुकाप्रमुख विक्रम चौगुले, हिंदुत्ववादी शरद माळी, पै. बाबुराव पाटील, सागर पाटील,अपंग सेनेचे संदीप दळवी, कैलास जाधव, बाळासो नलवडे, भूषण चौगुले, योगेश लोहार, प्रफुल्ल घोरपडे आदी उपस्थित होते.