कोल्हापूर : करवीर तालुक्याच्या विभाजनासह जिल्हयातील निकडीचे आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.
कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासकीय, विकासात्मक व कायदेविषयक प्रलंबित प्रश्नांबाबत कार्यवाहीची मागणी करणारी निवेदने दिली आहेत. या मागण्यांमध्ये जिल्ह्यातील अनेक प्रलंबित आणि रखडलेल्या प्रश्नांचा समावेश आहे. यामध्ये कोल्हापूर विमानतळासाठी नव्याने संपादीत होणाऱ्या गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील ६४ एकर जमीनीमधील लक्ष्मीवाडी या वसाहतीचे पुनर्वसन सर्व्हे नं. २९१ मध्ये व्हावे व गट नं. ३२८ ब मधील गायरान क्षेत्र पुनःश्च ग्रामपंचायतीस देण्यात यावे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील वाढीव गावठाण मधील क्षेत्रधारकांची नावे ७/१२ पत्रकी नोंद व्हावी तसेच कोल्हापूर शहरातील शिल्लक रहिवाशी भागाची सीटी सर्व्हे मोजणी होवून प्रॉपर्टी कार्ड तयार होणेकरीता निधी उपलब्ध व्हावा, इ. प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
तसेच करवीर तालुक्यावरील लोकसंख्येचा ताण विचारात घेता प्रशासकीय सोयीसाठी तालुक्याचे विभाजन करण्याबाबतची प्रलंबित कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, खनिकर्म उत्खनन कायद्यात दुरुस्ती करावी व कोल्हापूर जिल्ह्यातील मंजूर असलेल्या तलाठी चावडी व महसूल कार्यालयांच्या बांधकामांना निधी उपलब्ध व्हावा, इत्यादी महत्त्वपूर्ण मागण्यांचाही समावेश आहे. यावर शक्य तितक्या लवकर अंमलबजावणी करणार असल्याची ग्वाही महसुलमंत्र्यांनी अमल महाडिक यांना दिली.