बीड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी पहाटे अपघाती निधन झाले होते. हा अपघात नेमका कसा झाला ? अपघातानंतर नेमके काय झाले? हे समजायला हवे. त्यामुळे या अपघाताची चौकशी करावी, अशी मागणी विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे.
“या अपघातामुळे आमचे कुटुंब पोरके झाले आहे. त्यामुळे सत्यस्थिती समोर येणे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मी स्वतः डॉक्टर आहे. विनायक मेटेंना रुग्णालयात आणताच त्यांचे शरीर पाहिल्यानंतर हा अपघात काही वेळेपूर्वी झालेला नाही, हे माझ्या लक्षात आले होते. किमान दीड, दोन तासांपूर्वी हा अपघात झालेला असावा. अपघातानंतर नेमके काय झाले, हे मला माहिती नाही; मात्र या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. त्यांना वेळेत उपचार मिळाले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते,” असेही त्यांनी सांगितले.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
विनायक मेटे यांचे पार्थिव रात्री उशिरा बीडमध्ये आणल्यानंतर शिवसंग्राम भवन येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर सोमवारी दुपारी मेटे यांच्या पार्थिवावर बीड येथील उत्तमनगरमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते प्रवीण दरेकर यांसह राजकीय क्षेत्रातील अनेक नेते, पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.