भाजप प्रदेशाध्यक्षपदी ‘यांची’ तर मुंबई अध्यक्षपदी ‘यांना’ संधी

नवी दिल्ली : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावर आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची तर मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षामध्ये ‘एक व्यक्ती, एक पद’ हा निकष लावला जातो. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना पक्षातील पदे सोडावी लागली आहेत.

चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे भाजपचे प्रदेशाध्यक्षपद होते, मात्र आता ते मंत्री झाल्याने त्यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी ओबीसी चेहरा म्हणून आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड करण्यात आली आहे.

भाजपचे दमदार नेते मंगलप्रभात लोढा यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने आशिष शेलार यांच्याकडे मुंबई भाजपची जबाबदारी सोपवली गेली आहे. भाजपमधील महत्त्वाचा चेहरा म्हणून आशिष शेलार यांची ओळख आहे. मराठा नेता, टास्कमास्टर, सर्वपक्षातील नेत्यांशी उत्तम संबंध या शेलारांच्या जमेच्या बाजू आहेत. फडणवीस सरकारमध्ये शेलारांकडे ५ महिने शिक्षण मंत्रिपद होते. विनोद तावडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शेलार यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आक्रमक पद्धतीने मैदानात उतरण्यासाठी भाजप शेलारांवर जबाबदारी दिली आहे. २०१७ मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाली. ही निवडणूक शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढवली. त्यावेळी शेलार यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी दिली होती. त्यावेळी भाजपने ३१ वरून ८२ वर उडी मारली होती.

🤙 8080365706