शिवसेनेच्या ‘त्या’ निर्णयावर काँग्रेस, राष्ट्रवादी नाराज

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने सत्ता स्थापन केली. मात्र अजूनही महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये नाराजीनाट्य सुरूच आहे.

शिवसेनेने इतर पक्षांशी चर्चा न करता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला. यावरून काँग्रेसने शिवसेनेवर टीका केली, यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही शिवसेनेच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे तर विधान परिषदेचे उपसभापतीपद शिवसेनेकडे आहे, त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळायला पाहिजे, असे वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केले. दुर्दैवाने शिवसेनेकडून विचारणा झाली नाही, हा आमचा आक्षेप आहे. आम्ही जर मित्र आहोत तर एकमेकांशी बोलले पाहिजे, अशा शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली.