कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांनी आज राज्यसभेत कोल्हापूरच्या विकासाच्यादृष्टीने आणि राजर्षी शाहू महाराजांच्या सन्मानाप्रित्यर्थ एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. राजर्षी शाहूंच्या स्मृतीशताब्दी वर्षात कोल्हापुरात एनआयटी संस्थेची स्थापना करावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली.

२०२२ हे वर्ष राजर्षी शाहू महाराज स्मृतीशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत आहे. लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक समतेसह शिक्षण क्षेत्रातही मोठी कामगिरी केली आहे. गरीब आणि मागास विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी विविध बोर्डींग हाऊस सुरू केली. सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. पारंपारिक शिक्षणाच्या बरोबरीने कृषी, औद्योगिक, वैद्यकीय शिक्षणाचाही त्यांनी प्रसार – प्रचार केला. राजर्षि शाहूंच्या शैक्षणिक कार्याला अधिक व्यापक करण्यासाठी त्यांच्या स्मृती शताब्दी वर्षात कोल्हापुरात एनआयटी म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेची स्थापना करावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत केली.

व्यापक जनहित लक्षात घेवून आणि कोल्हापूरची शैक्षणिक परंपरा आणि क्षमता लक्षात घेवून, केंद्र सरकारने एनआयटीला मान्यता द्यावी आणि त्यातून राजर्षी शाहू महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, अशी अपेक्षा खासदार महाडिक यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे खर्या अर्थाने राजर्षी शाहूंच्या कार्याला उजाळा मिळेल आणि गोरगरीब, होतकरू विद्यार्थ्यांना उच्च आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. तसेच कोल्हापुरात एनआयटीची स्थापना करणे, हीच राजर्षीना खरी आदरांजली ठरेल, असे मतही खासदार महाडिक यांनी व्यक्त केले आहे.