कागलच्या कुरणे कॉलनीसह सात कॉलनीतील नागरिकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : कागलमधील कुरणे वसाहतीप्रमाणे इतर सात अनियमित कॉलनीतील नागरिकांनाही त्यांचे घराचे प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत .त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यामुळे बरीच वर्षे रेंगाळलेल्या कुरणे वसाहतीप्रमाणे इतर सात कॉलनीतील नागरिकांनाही त्यांचे घराचे प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे, अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. घाटगे पुढे म्हणाले, कागलमधील बरीच वर्षे रेंगाळत असलेल्या प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी याबाबतीत कार्यवाही करावी,असे जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने आदेश दिले होते. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासमवेत कुरणे वसाहत व इतर सात कॉलनी संदर्भात आज मिटिंग बोलावली होती. त्या मिटिंगमध्ये आम्ही जो पाठपुरावा केला होता. त्यानुसार कुरणे वसाहती मधील 54 घराचे प्रॉपर्टी कार्ड काढण्याचा आदेश त्यांनी दिला.

त्याचबरोबर कागलमधील वड्डवाडी वसाहत, राजीव गांधी वसाहत, बिरदेव वसाहत, रेल्वेलाईन वसाहत, स्मशानभूमी लाईन वसाहत, सांगाव नाका मातंग वसाहत, पसारेवाडी वसाहत या सात वसाहतींचे प्रस्ताव व अहवाल तातडीने पाठवण्याबाबत चर्चा झाली. जेणेकरून बऱ्याच वर्षांपासून प्रॉपर्टी कार्ड पासून वंचित असणाऱ्या या नागरिकांना लवकरात लवकर स्वतःचे प्रॉपर्टी कार्ड मिळतील. प्रॉपर्टी कार्ड अभावी या लोकांची होणारी कुचंबणानाही त्यामुळे दूर होणार आहे.असेही ते म्हणाले .
शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांच्या या जिव्हाळ्याच्या विषयावरील तातडीने लक्ष घालून कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याबद्दल आभार मानले.

🤙 9921334545