इचलकरंजी (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत सोमवार १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शिवतीर्थपासून भव्य तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या सहयोगाने काढण्यात येणार्या या तिरंगा रॅलीत सहभागी होणार्या प्रत्येकाला तिरंगा ध्वज दिला जाणार आहे. या रॅलीत इचलकरंजीवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे, या उद्देशाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये देशभरात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने इचलकरंजी शहरात १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर सकाळी ११ वाजता भव्य अशी तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील सर्व सार्वजनिक मंडळे, संघटना, संस्था, शाळा, महाविद्यालये, एनसीसी, एमसीसी कॅडेटस्, क्रीडा मंडळे, खेळाडू, महिला बचत गट आणि शहरवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. सर्वच ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा म्हणजेच शिवतीर्थ येथे जमायचे आहे. तेथून ११ वाजता स्वातंत्र्य रॅलीला प्रारंभ होईल.

या रॅलीमध्ये भारतमातेची भव्य अशी मूर्ती असणार आहे. महात्मा गांधी पुतळा येथे भारतमातेचे पुजन करुन रॅलीची सांगता करण्यात येईल. रॅलीत सहभागी प्रत्येकाच्या हाती तिरंगा ध्वज असणार आहे. त्याचबरोबर १३ ते १५ ऑगस्ट कालावधीत घरावर तिरंगा ध्वज लावण्यासाठी ताराराणी पक्षाच्यावतीने ध्वज दिला जाणार आहे. त्यासाठीही नागरिकांनी पक्ष कार्यालयात संपर्क साधून ध्वज घेऊन जाणे, असे आवाहन आमदार आवाडे यांनी केले आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणे हा आपल्या सर्वांसाठीच अभिमान आणि गौरवाचा क्षण आहे.
हर घर तिरंगा या अनोख्या उपक्रमात भारतीय नागरिक म्हणून आपण सर्वांनीच सहभागी व्हायला हवे. आपल्यामध्ये असलेले राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम या अभियानाअंतर्गत होणार आहे. हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे. त्यामध्ये इचलकरंजी शहर व परिसरातील प्रत्येक नागरिकांनी सहभागी होऊन स्वतःचे घर, कार्यालय येथे अभिमानाने तिरंगा फडकवून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन आमदार आवाडे यांनी केले आहे.