मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. यानंतर काल त्यांना मुंबई सेशन कोर्टात हजर केले असता ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. त्यानंतर सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईला वेग आला असून संजय राऊतांशी संबंधित आणखी दोन ठिकाणी मुंबईत छापे टाकण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने नेमकी कोणत्या ठिकाणी छापेमारी केली आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, संजय राऊतांशी संबंधित दोन ठिकाणी ईडीचे सर्च ऑपरेशन सुरू असून या सर्च ऑपरेशनमधून बरीच माहिती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच यामुळे राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राऊत यांना अटक केल्यानंतर त्यांच्याशी संबंधित असणाऱ्यांना पुन्हा एकदा ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. या लोकांची पुन्हा चौकशी करून महत्त्वाची माहिती घेतली जाणार असल्याचे बोलले जात आहे. तर स्वप्ना पाटकर या पत्राचाळ प्रकरणातील साक्षीदार असून त्यांनाही चौकशीला बोलावले जाऊ शकते.