पुरुषार्थ आणि मर्दानगी असेल तर आमच्यापेक्षा जास्त निधी आणा : आमदार मुश्रीफ

सुळकुड : मंजूर झालेला निधी अडविण्यापेक्षा अंगात पुरुषार्थ आणि मर्दानगी असेल तर आमच्यापेक्षा जास्त निधी आणा आणि जनतेची कामे करा, असे जाहीर आव्हानच आमदार हसन मुश्रीफ यांनी दिले. कागल तालुक्यात मंजूर झालेला निधी अडविणारी अलीकडे एक शक्ती जन्माला आलेली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

सुळकुड (ता. कागल) येथे १८ कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमात आमदार मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने हेही उपस्थित होते.

सभेपूर्वी विद्युत रोषणाईने सजविलेल्या रथातून आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार संजयबाबा घाटगे, गोकुळचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने या प्रमुख मान्यवरांची भर पावसातूनच तब्बल अडीच तास मिरवणूक निघाली.

आमदार मुश्रीफ म्हणाले, या तालुक्याला स्वर्गीय कै. विमलाताई बागल, कै. शामराव भिवाजी पाटील, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी कै. दौलतराव निकम, कै. सदाशिवराव मंडलिक, कै. विक्रमसिंहराजे घाटगे, संजयबाबा घाटगे व मी अशी आमदारकीची उज्वल परंपरा आहे. आजपर्यंत मंजूर झालेला निधी परत घालवण्यासाठी कोणीही प्रयत्न केलेले नाहीत. परंतु; अलीकडे मात्र मुंबईला खेटे मारून, तिथेच तळ ठोकून निधी परत घालवून विकासाला खीळ घालणारी अपप्रवृत्ती जन्माला आली आहे. जनतेनेही घातक प्रवृत्ती ओळखली पाहिजे.

माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, सत्ता ही लोककल्याणासाठी असते, मिजास मारण्यासाठी नसते. सत्ता गोरगरिबांसाठी राबवायची असते. आमदार हसन मुश्रीफ यांच्यामध्ये गोरगरिबांच्यासाठी सत्ता राबविण्याचे सामर्थ्य आहे. त्यांनी ते सिद्ध करून दाखविले आहे.

गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील म्हणाले, आमदार हसन मुश्रीफ मंत्री असोत अगर नसोत. विकासकामे आणि अखंड, अव्याहतपणे गोरगरिबांची सेवा हे त्यांचे व्रतच आहे.

केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, कागल तालुक्यात मंजूर झालेली कामे राजकीय द्वेषापोटी नामंजूर करण्यासाठी मुंबईत तळ ठोकून बसणारी औलाद जनहिताच्या विरोधातच आहे.
दादासो चवई म्हणाले, आमदार हसनसाहेब मुश्रीफ व माजी आमदार संजय बाबा घाटगे यांच्या सहयोगातून सुळकुड गाव विकासाच्या बाबतीत आघाडीवर राहील. या गावाला एक मॉडेल व्हिलेज म्हणून लवकरच लौकिक मिळेल.

व्यासपीठावर सरपंच सौ. सुप्रिया भोसले, बापूसाहेब पाटील, तात्यासाहेब वाणी, युवराज पाटील, बाळासाहेब हेगडे, सुकुमार हेगडे, क्रांतीकुमार पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत डॉ. अरुण मुदाण्णा यांनी केले. प्रास्ताविक शिवाजीराव लगारे यांनी केले.