राज्यपालांच्या वक्तव्याचा वाद दाबण्यासाठीच संजय राऊतांना अटक; ‘यांचा’ दावा

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सुरु झालेल्या वादावरून सर्वांचे लक्ष हटविण्यासाठीच शिवसेना खासदार संजय राऊत यांना मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

मुबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते. पण गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात केले होते. त्यावर सर्व पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली होती. त्यापाठोपाठ सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी संजय राऊत यांना रविवारी रात्री उशिरा अटक केली. ईडीने सर्वप्रथम सकाळी राऊत यांच्या भांडुपस्थित मैत्री निवासस्थानी सुमारे साडेनऊ तास आणि नंतर फोर्ट येथील ईडीच्या कार्यालयात आठ तास चौकशी केल्यावर मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली.

त्यामुळे शिवसेनेने या दोन्ही गोष्टींचा परस्पर संबंध असल्याचा दावा केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर पडदा टाकण्यासाठीच राऊत यांच्याविरोधात कारवाई करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने दैनिक सामनाच्या अग्रलेखाद्वारे केला आहे. राज्यपाल हे एक घटनात्मक आणि प्रतिष्ठेचे पद आहे. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल मात्र यास अपवाद ठरले आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्र सेवेपेक्षा भाजपा सेवाच जास्त केली, पण शुक्रवारी तर त्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर, अस्मितेवरच घाव घातला, अशी टीका शिवसेनेने केली आहे.