बर्मिंगहॅम : टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती मीराबाई चानूने बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ‘सुवर्णपदक’ जिंकत सुवर्ण कामगिरी आपल्या नावावर केली.
मीराबाई चानूने कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलंय. चानूने 49 किलो वजनी गटात ही सुवर्ण कमाई केली आहे. चानूने एकूण 201 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकलं. चानूने स्नॅचमध्ये 88 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो वजन उचलून विक्रमही केला. टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या भारताच्या या स्टार वेटलिफ्टरने स्नॅचमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत विक्रम केला. मीराबाईने क्लीन अँड जर्कमध्ये विक्रमी कामगिरी कायम ठेवली आहे. तिने पहिल्या प्रयत्नात 109, दुसऱ्या प्रयत्नात 113 किलो वजन उचलले. चानूला क्लीन अँड जर्कमध्ये तिसऱ्या प्रयत्नात 115 किलो वजन उचलायचे होते. मात्र या प्रयत्नात ती यशस्वी होऊ शकली नाही. भारताच्या या स्टार वेटलिफ्टरने गेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावलं होतं.