राजाराम कारखान्यातर्फे ध्वजवाटप – अमल महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानासाठी श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सभासदांना मोफत तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात येणार आहे.त्यामुळे सभासदांनी आपल्या घरावर ध्वज फडकावून या अभियानाला बळकटी द्यावी, असे आवाहन कारखान्याचे संचालक आणि माजी आमदार अमल महाडिक यांनी सभासदांना केले आहे.

‘हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट रोजी घरोघरी तिरंगा फडकवला जावा असं आवाहन आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.या अभियानामुळे तिरंग्याशी आणि पर्यायाने राष्ट्राशी असलेला आपला संबंध अधिक दृढ होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.

कारखान्यामार्फत सातत्याने शेतकर्‍यांसाठी विविध कृतिशील उपक्रम राबवले जात असतात. विविध कार्यशाळा, शिबिरे यांसह अनेक सभासदहिताचे उपक्रम राबविण्यास कारखाना तत्परतेने कार्यरत आहे. अनेक नवनवीन प्रगतशील पावले उचलत कारखान्याने नेहमीच सामाजिक भान जपले आहे. भारतीय तिरंग्याप्रति आपल्या मनात दृढ असलेला आदरभाव व्यक्त करण्यासाठी भारतीय सरकारमार्फत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात सक्रियपणे सहभाग नोंदवून सभासदांना मोफत तिरंगा ध्वज देण्यासाठी सर्वप्रथम राजाराम कारखान्याने पुढाकार घेतला याचा अभिमान वाटतो. सोबतच इतर साखर कारखाने व सहकारी संस्थांनीही या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवावा अशी विनंतीही अमल महाडिक यांनी केली आहे.