‘त्यांनी’ देशाची माफी मागून प्रायश्चित्त करावे-शौमिका महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी): काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी,अधीर रंजन चौधरी आणि सर्व काँग्रेसजनांनी देशाची माफी मागून प्रायश्चित्त करावे अशी मागणी गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

पुढे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधिर रंजन चौधरी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी अत्यंत असंस्कृत आणि असभ्य टिप्पणी करून काँग्रेसच्या हीन संस्कृतीचे दर्शन घडविले आहे. चौधरी यांच्या या वक्तव्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रोत्साहन दिल्याने देशातील महिलांचा,समृद्ध परंपरा असलेल्या आदिवासी समाजाचा आणि राष्ट्रपतीपदाचा अपमान झाला आहे. 

भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सुरू असलेल्या सोनिया गांधींच्या ईडी चौकशीस विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरून कायदा सुव्यवस्थेस बट्टा लावणाऱ्या काँग्रेसजनांनी देशाच्या राष्ट्रपतींचा अपमान होत असताना मौन का बाळगले ? हाही प्रश्न आहेच.

गुरुवारी लोकसभेत काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांनी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केला.जाणीवपूर्वक अपमान करण्याच्या उद्देशाने चौधरी यांच्याकडून हा उल्लेख होत असताना सोनिया गांधी यांनी मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वर्णवर्चस्ववादी मानसिकतेचे दर्शन घडविले आहे. 

सभागृहाच्या शिस्तीला आणि सभ्यतेच्या संकेतास बट्टा लावण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून वारंवार होत असतो.  राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांचा अपमान करण्यासाठी सोनिया गांधी यांनी जाणीवपूर्वक चौधरी यांना फूस लावली का ? हेही पाहिलं पाहिजे. सोनिया गांधी या स्वतः महिला असूनही त्यांनी महिलेविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या चौधरी यांना समज दिली नाही, याचे आश्चर्य वाटते. काँग्रेसची ही महिलाविरोधी मानसिकता आता संपूर्ण देशासमोर उघड झाली आहे. तेव्हा या उद्दामपणाबद्दल सोनिया गांधी,अधीर रंजन चौधरी आणि सर्व काँग्रेसजनांनी देशाची माफी मागून प्रायश्चित्त घेतले पाहिजे अशी आमची मागणी आहे.