लोकसहभागातून जलशक्ती अभियान प्रभावीपणे राबवा : धर्मराज खटीक

कोल्हापूर : जलशक्ती अभियान हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून लोकसहभागातून हे अभियान प्रभावीपणे राबवा, अशा सूचना
जलशक्ती अभियानाचे केंद्रीय समन्वयक तथा कोल्हापूर व सांगली समिती प्रमुख धर्मराज खटीक यांनी केल्या.

जलशक्ती अभियानाच्या अंमलबजावणीबाबत श्री खटीक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी जलशक्ती मंत्रालयाचे उपसंचालक डी. गणेशकुमार, जिल्हा जलसंधारण अधिकारी बाळासाहेब आजगेकर, रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर तसेच विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

समिती प्रमुख खटिक म्हणाले, जलशक्ती अभियान हे ‘जनशक्ती अभियान’ व्हावे, अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता उपलब्ध पाणी अपुरे पडू नये, यादृष्टीने पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यासाठी देशपातळीवर जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर भूजलाची पातळी वाढविणे व जलप्रदूषण रोखण्यासाठी हे अभियान महत्वपूर्ण आहे, असे सांगून जलसंधारणाच्या सर्व कामांना एकत्र करून २०१९ साली जलशक्ती मंत्रालय सुरु केले आहे. या मंत्रालयाद्वारे देशातील २५६ दुष्काळी जिल्ह्यात पावसाचे पाणी साठवण्याचे उपक्रम सुरु केले आहेत. तसेच रेनवॉटर हार्वेस्टींगवर भर देऊन जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत, अशी माहिती केंद्रीय उपसचिव तथा समिती प्रमुख धर्मराज खटीक यांनी दिली.विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांची माहिती दिली.

केंद्रीय जलशक्ती समितीकडून कामांची पाहणी

कोल्हापूर जिल्ह्यातही जलशक्ती अभियान चांगल्या पद्धतीने राबविण्यात येत असून केंद्रीय जलशक्ती समितीने दोन दिवस कोल्हापूर जिल्हा दौरा केला. समिती प्रमुख धर्मराज खटिक यांच्या नेतृत्वाखालील समितीने जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील मृद आणि जलसंधारण विभाग, जलसंपदा विभाग, वन विभाग तसेच जिल्हा परिषद, रोजगार हमी योजना आदी विभागांच्या कामांची पाहणी केली. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी बाळासाहेब आजगेकर आणि सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी संतोष पाटील या समिती सदस्यांबरोबर उपस्थित होते.


जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील प्रामुख्याने जलसंपदा विभाग -उचंगी प्रकल्प, वन विभाग -आवंडी वृक्षारोपण, जिल्हा परिषद रोहयो विभाग- मासेवाडी गाव (शोष खड्डे), जलसंधारण विभाग- पाटबंधारे तलाव दुरुस्ती बेकनाळ, लघु पाटबंधारे तलाव दुरुस्ती घाटकरवाडी, पाटबंधारे तलाव दुरुस्ती मेढेवाडी या कामांची पाहणी केंद्रीय जलशक्ती अभियान समितीच्या सदस्यांनी केली.