कोल्हापूर : शिवसेनेचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. सोमवारी, १ ऑगस्टला त्यांचा दौरा असून ठाकरे यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम आज संध्याकाळी निश्चित होणार असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख सुनील मोदी यांनी दिली. आदित्य ठाकरे बंडखोराबद्दल काय बोलतात, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला भगदाड पडले आहे. जिल्ह्यातील शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, शिवसेना खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने, माजी आमदार राजेश क्षीरसागर शिंदे गटात सामील झाले आहेत. तर माजी शिवसेना आमदार चंद्रदीप नरके आणि सुजित मिणचेकर हेसुद्धा शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेची बांधणी करण्याचे आव्हान शिवसेनेसमोर आहे. शिवसेनेच्या पुनर्बांधणीसाठी आदित्य ठाकरे राज्यभर दौरे करत आहेत त्याच पार्श्वभूमीवर ते कोल्हापूरचाही दौरा करणार आहेत
