मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु या शुभेच्छामध्ये शिंदे यांनी ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख न केल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना,” असे शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. तसेच या शुभेच्छा देताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख न केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत.
दरम्यान, आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. या शक्तीप्रदर्शनाच्या माध्यमातून बंडखोर आमदारांना आपली ताकद दाखवण्याचा ठाकरेंचा प्रयत्न असणार आहे. तर मागील दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीतून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार आसूड ओढला आहे. या मुलाखतीतच उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना शिवसेनाप्रमुख व्हायचे आहे, अशी बोचरी टीका केली आहे.
