काँग्रेसचा आज राज्यभर ‘सत्याग्रह’

मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार विरोधकांना संपवण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणांचा वारेमाप दुरुपयोग करत आहे. मोदी सरकारच्या या दहपशाहीला काँग्रेस पक्ष भीक घालत नाही. सोनिया गांधी आजारी असून वयाच्या ७० व्या वर्षी त्यांना चौकशीच्या नावाखाली नाहक त्रास दिला जात आहे. याच्या निषेधार्थ कॉंग्रेस आज राज्यभर सत्याग्रह आंदोलन करणार आहे.

मोदी सरकारच्या या हुकूमशाही विरोधात काँग्रेस पक्ष मंगळवार दि. २६ जुलै रोजी पुन्हा एकदा शांततापूर्ण सत्याग्रह करून या कारवाईचा विरोध करेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हटले आहे. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर शहर – जिल्हा काँग्रेसतर्फेही सत्याग्रह करण्यात येणार आहे.

मोदी सरकारच्या सूडाच्या राजकारणाविरोधात मंगळवारी मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यासमोर सकाळी १० वाजता सत्याग्रह केला जाणार असून जोपर्यंत सोनिया गांधी यांना ईडी कार्यालयातून मुक्त केले जात नाही, तोपर्यंत सत्याग्रह सुरुच राहणार आहे.

२१ तारखेला सोनिया गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. आता पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. खा. राहुल गांधी यांचीही पाच दिवस दररोज १०-१० तास ईडीने चौकशी केली. या चौकशीतून काहीही निष्पन्न झालेले नाही व होणार नाही. ईडीचे अधिकारी केंद्रातील त्यांच्या ‘बॉस’च्या इशाऱ्यावर नाचत आहेत.

चौकशीच्या नावाखाली विरोधकांना त्रास देण्याचे भाजपाचे राजकारण फारकाळ टिकणार नाही.काँग्रेस पक्षाने सुडाचे राजकारण कधीच केले नाही पण केंद्रात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) सरकारने लोकशाही व संविधान धाब्यावर बसवून विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून त्रास देत आहे.

🤙 8080365706