महामहिम द्रौपदी मुर्मू विराजमान; देशाच्या १५ व्या राष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज, सोमवारी देशाच्या १५ व्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी झाला. देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांनी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली. यावेळी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते.

शपथविधीनंतर राष्ट्रपती मुर्मू यांचे अभिभाषण झाले. यावेळी त्या म्हणाल्या की, राष्ट्रपतीपदाची जबाबदारी अत्यंत मोठी आहे. या पदाचा मान ठेऊन मी पुढील काळात अत्यंत जलद गतीने काम करणार आहे.

समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करणार आहे. जनतेचे कल्याण हेच माझे लक्ष असेल. देशहिताचे कार्य करणाऱ्या महिला माझा आदर्श आहेत. देशाच्या सर्वोच्च पदावर निवडून दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

आपला भारत देश स्वातंत्र्याची ५० वर्षे साजरे करत होता तेव्हा मी माझ्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. आणि आज ७५ व्या वर्षी मला नवा पदभार मिळाला आहे. मी देशातील पहिली अशी राष्ट्रपती आहे जी भारताच्या स्वातंत्र्यानंतर जन्माला आले आहे.

आपल्या स्वातंत्र्यसेनानींनी आपल्याकडे ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या, त्या अपेक्षा अमृतमहोत्सव काळात पूर्ण करण्यासाठी गतीशील करायच्या आहेत. यापुढे सबका प्रयास आणि सबका कर्तव्य या दोन रुळांवरून आपल्याला पुढे जायचं आहे. उद्या, २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस आहे. हा दिवस भारतीय सेनेच्या शौर्य आणि संयमाचे प्रतिक आहे.

मी माझी जीनवयात्रा ओडिसातील एका छोट्या गावातून सुरू केली होती. मी ज्या भागातून येते तिथे शिक्षण घेणंसुद्धा कठीण मानलं जातं. मात्र, अनेक संकटांनंतरही माझा संकल्प दृढ राहिला आणि मी कॉलेजला जाणारी माझ्या गावातील पहिली मुलगी बनली.

मी आदिवासी समाजातून आहे. तरीही मी वॉर्ड कॉन्सिलरपासून भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचू शकले. भारतातील लोकशाहीची ही महानता आहे. एका गरीब कुटुंबात जन्माला आलेली मुलगी, आदिवासी समाजातील मुलगी राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचते ही भारतातील लोकशाहीची ताकद आहे. राष्ट्रपती पदासाठी माझी निवड झाल्याने हे स्पष्ट होतंय की भारतातील लोक स्वप्नही पाहू शकतात आणि ती पूर्णही करू शकतात.