कागल (प्रतिनिधी) : शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत ७ हजार ४००हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना व श्री छत्रपती शाहू कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कागल यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा झाल्या.

कागलच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्या मंदिर, मुरगुड येथे मुरगुड विद्यालय,सेनापती कापशी येथील न्यायमूर्ती रानडे विद्यालय व करवीर तालुक्यातील कणेरी येथील काडसिद्धेश्वर विद्यालय अशा चार केंद्रावर या स्पर्धा झाल्या. पहिली ते तिसरी, चौथी ते पाचवी, सहावी ते सातवी,आठवी ते दहावी, मूकबधिर पहिली ते चौथी व मतिमंद अशा सहा स्वतंत्र गटात या स्पर्धा झाल्या.
शाहू कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण म्हणाले, शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ५५ व्या वाढदिवसाचे निमित्ताने २००३ पासून या स्पर्धा घेण्यात येत आहेत.आता त्यांच्या जयंती निमित्त या स्पर्धा विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात पार पडत आहेत. सुरुवातीला फक्त कागल केंद्रावर होणाऱ्या या स्पर्धा पालक व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आता कागलसह मुरगूड,सेनापती कापशी व करवीर तालुक्यातील कणेरी अशा चार केंद्रावर घेण्यात येत आहेत. या स्पर्धेत ७ हजार ४०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
यावेळी शाहू साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, संचालक यशवंत उर्फ बाॕबी माने, युवराज पाटील,सचिन मगदूम, प्रा. सुनिल मगदूम, सतीश पाटील, भाऊसाहेब कांबळे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण,परीक्षक सूर्यकांत होळकर, विश्वास पाटील, दादासो जंगटे, संदीप कुंभार, प्रशासक एम. व्ही .वेसवीकर , मुख्याध्यापक एस. डी. खोत आदी उपस्थित होते.
सुरुवातीला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे व स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन केले. स्पर्धेचे उदघाटन दीपप्रज्वलन करून मान्यवरांनी केले. प्रास्ताविक संचालक यशवंत उर्फ बाॕबी माने यांनी केले.आभार बाजीराव पाटील यांनी मानले.
मूकबधिर, मतिमंद विद्यार्थ्यांचाही सहभाग
या स्पर्धेत मूकबधिर व मतिमंद विद्यार्थ्यांसाठीच्या स्वतंत्र गटात विद्यार्थ्यांनी उत्सफुर्त सहभाग नोंदविला.