मुंबई : आमचा लाऊडस्पीकर हा जनतेचा बुलंद आवाज आहे. कोणाला कितीही पिपाण्या वाजवू द्या. शिवसेनेचा लाऊडस्पीकर ५६ वर्ष सुरु असून मिस्टर फडणवीस हा लाऊडस्पीकर तुम्हाला बधीर केल्याशिवाय राहणार नाही, असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊत यांना टोला लगावत म्हटले होते की, “तुम्ही त्यांना कृपया शिव्या देऊ नका, उलट आभार माना. हे सरकार येण्यात त्यांचा जितका वाटा आहे, तितका इतर कोणाचाच नाही. महाराष्ट्राच्या जनतेला, शिवसेनेच्या नेत्यांना त्यांनी वैताग आणला. त्यामुळे हा लाऊडस्पीकर बंद करायचा असेल तर सत्तापरिवर्तनाशिवाय पर्याय नाही असा निर्णय त्यांनी घेतला, असे फडणवीस म्हणाले होते.
राऊत पुढे म्हणाले की, आदित्य ठाकरेंचा दौऱा ठाण्यातून सुरु झाला आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला, सभांना, रोड शोला जो प्रतिसाद मिळत आहे, त्यासाठी उदंड हा शब्द कमी पडेल. तसेच काल जे आम्ही पैठणचे चित्र पाहिले, ते पाहून पैठणचा नाथसागरच रस्त्यावर उसळत होता. तो माणसांच्या रुपात होता. हे चित्र ज्यांनी महाराष्ट्रात चोऱ्या माऱ्या केल्या. ज्यांनी सरकार स्थापन केलं त्यांच्या छातीत धडकी भरवणारे होते. तसेच काल अनेकांच्या डोळ्यातून अश्रू आले. त्या अश्रूंच्या महापुरातच हे डबल स्टँडचे सरकार वाहून गेल्याशिवाय राहणार नाही. आम्ही भाजपसारख्या तारखा देणार नाही. हे सरकार ११ दिवसात पडेल, १५ दिवसात पडेल असे आम्ही म्हणणार नसल्याचेही राऊत यावेळी म्हणाले. भाजपमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्या नाही. तिथे मनमोकळेपणाने मत व्यक्त करता येत नाही. तरीही मी चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन करतो, त्यांनी थोडा काळ कोल्हापूरचे पाणी दाखवले. जे त्यांच्या पोटात मळमळत होते, ते पोटावर आले. भाजपच्या कार्यकर्त्यांची भावना आहे, असा खुलासाही त्यांना करावा लागला. त्या भावनेचा आदर व्हायला हवा होता” असेही ते म्हणाले.