मुंबई: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेनेवरील हक्कावरुन सुरु असलेली लढाई आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. हा वाद आता निवडणूक आयोगाच्या दारापर्यंत गेला आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटाला ८ ऑगस्टला दुपारी १ वाजेपर्यंत कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यातच आता शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविचारांवर चालणारी शिवसेना आमचीच आहे असा दावा केला आहे. तर उद्धव ठाकरे यांनीही शिवसेना आमचीच म्हणणारे लोक जे आहेत त्यांना भुलू नका असे म्हटले आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनीही शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा काढली आहे. त्यामुळे शिवसेना नेमकी कुणाची ते सिद्ध करा असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
दरम्यान, शिवसेनेतल्या ठाकरे विरूद्ध शिंदे गटाची लढाई सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. १ ऑगस्टला या प्रकरणी सुनावणी होणार आहे. या सुनावणीत आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर खंडपीठाकडून सुनावणी होणार आहे. याचदरम्यान आता निवडणूक आयोग दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर सुनावणी करणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण नेमके कोणाकडे राहणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.