ओरंगाबाद (वृत्तसंस्था) : वकील असताना आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्याची न्यायालयात बाजू मांडली. काही दिवसांपूर्वी त्या शेतकऱ्याने वकिलीचे शुल्क म्हणून मला पोतंभर मक्याची कणसं भेट दिली. कणसं स्विकारताना शेतकरी पक्षकाराची त्यामागील भावना आपल्या ह्रदयात घर करून गेली, असा भावस्पर्शी अनुभव राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांनी कथन केला.

औरंगाबाद खंडपीठ वकील संघाच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात न्या. शिंदे यांनी आपला वकिली व्यवसायाचा अनुभव सांगितला. तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटात सभागृहाने त्याला दाद दिली
शिंदे यांनी सांगितले, मनुष्य कितीही मोठ्या पदावर गेला तरी त्याचे पाय कायम जमिनीवर पाहिजे. घरी कुठलीच पार्श्वभुमी नसताना केवळ संघर्ष आणि परिश्रमामुळे मुख्य न्यायमूर्ती पदावर पोहोचले. त्यामुळे शेतकऱ्याने दिलेली कणसं संपूर्ण गल्लीत आनंदाने वाटली.
पक्षकारांच्या आर्थिक क्षमता विषम असल्याचे सांगून न्या. शिंदे यांनी पक्षकारास केंद्रस्थानी ठेवून काम करावे, असे आवाहन केले. शिंदे म्हणाले, हायप्रोफाईल खटल्यांची अधिक चर्चा होऊन अशा खटल्यात न्यायसंस्थेचा जास्त वेळ जातो. उलट सामान्य माणसांच्या प्रकरणांचा निपटारा करण्याची गरज आहे. कारण न्यायसंस्था आधी पक्षकारांसाठी असून त्यात न्यायाधीश, वकील नंतर आहेत. आपले कुटुंब वारकरी संप्रदायाचे असल्याने शिस्तीत वाढल्याचे न्या. शिंदे यांनी सांगितले. याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. प्रसन्न वराळे, न्या. संजय गंगापूरवाला, औरंगाबाद खंडपीठाचे प्रशासकीय न्या. रवींद्र घुगे, महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे चेअरमन वसंतराव साळुंके, खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष नितीन सूर्यवंशी, सचिव सुहास उरगुंडे, उपाध्यक्ष निमा सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. बातम्या आणखी आहेत