कागल (प्रतिनिधी) : शेतीतील पिकांचा उत्पादन खर्च आणि ग्राहक यांच्या समन्वयातून उत्पादनांचे दर ठरविले जावेत, या उद्धात हेतुने बाजार समित्यांची उभारणी करण्यात आली. त्यामुळे या बाजार समित्यांचे खरे मालक हे शेतकरीच आहेत. असे असताना स्वतःला शेतकऱ्यांचा मुलगा समजणाऱ्या मुश्रीफ साहेबांना बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचे अधिकार मिळत आहेत, याचा पोटशूळ का? अशी विचारणा भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली आहे.
घाटगे यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रक काढले आहे. पत्रकात म्हटले आहे की, आजपर्यंत या बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. याला कायमचा लगाम घालण्यासाठी आणि बाजार समित्यांचा कारभार जनताभिमुख होण्यासाठी राज्य सरकारने बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मतदानाचा अधिकार योग्यच आहे. विद्यमान सरकारच्या या निर्णयाचे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
मक्तेदारी आत्ता थांबवावी
पावसाळा मध्यावर आला तरी आमदार साहेबांना पूर आढावा बैठक घेण्यासाठी वेळ मिळालेला नाही. आम्ही भाजप या राष्ट्रीय पक्षाचे अधिकृत जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) या नात्याने आणि सामाजिक बांधिलकीच्या नात्याने महापुराच्या पार्श्र्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने केलेल्या नियोजनाची माहिती घेण्यासाठी आढावा बैठक घेतली. तहसीलदारांना आम्ही भेटलो यात गैर काय ? तथापि जनतेच्या समस्यांबाबत तहसिलदार यांना कोणी भेटावे, कोणी भेटू नये हे अधिकार तुमच्या हितचिंतकाना कोणी दिले? ही मक्तेदारी आत्ता थांबवावी, असेही पत्रकात म्हंटले आहे