कागल (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा व्यापक विचार करून मतदारसंघाला भरीव निधी मिळवून देण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावे अशी आग्रही एकमुखी भूमिका हमिदवाडा कारखान्यावर झालेल्या मंडलिक गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत मांडली.
मात्र निर्णयाबाबतचे सर्वाधिकार खासदार मंडलिक यांना देण्यात आले. मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड. विरेंद्र मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अतुल जोशी होते. जिल्ह्याच्या राजकारणात सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मेळाव्यातील भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर कोरोना महामारी आणि महापूराच्या कारणाने खासदारांचा निधी गोठवल्यामुळे २०२४ च्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सामोरे जाताना जनतेपुढे निधीतून उभारलेली विकास कामे दाखवावी लागणार आहेत. राज्यात शिंदे यांचे सरकार तर केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील गावांच्या विकास निधीसाठी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी रहावे असा सूर बहुतांश प्रमुख कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना आणि ठाकरे घराणे याविषयीची कृतज्ञ भावनाही व्यक्त करायला कार्यकर्ते विसरले नाहीत. मात्र केवळ सहानुभूतीतून आगामी राजकारण करता येणार नाही. आता भरगच्च निधी घेऊनच जनतेसमोर जावे लागेल. याकरता भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीने खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आपले बळ लावावे असा आग्रह बहुतांश कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आर. डी. पाटील, माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, एन. एस. चौगुले, आनंदराव फराकटे, अनिल सिद्धेश्वर, भगवान पाटील,जयवंत पाटील, सुधीर पाटोळे, सत्यजित पाटील आदी कार्यकर्त्यांनी मनोगतातून मुख्यमंत्री शिंदे गटाबरोबर जाण्याचा विचार व्यक्त केला. दत्ता कसलकर यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी संजय मंडलिकानी राहावे अशी भूमिका मांडली.
नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी स्वागत व प्रास्ताविकात मुरगुडसाठी विकास निधी एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळाल्याचे सांगून मतदार संघाचा विकास व्हायचा असेल तर विकासाच्या मुद्द्यावर शिंदे गटाबरोबर राहण्याचा विचार मांडला. विकासाच्या गंगेला खीळ बसल्यामुळे आता निधी शिवाय पुढे राजकारण करणे अवघड असल्याचाही विचार त्यांनी मांडला.
विकास निधीसाठी आणि भविष्यातील राजकारणासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत राहण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह खासदार संजय मंडलिक यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे निरोप आपण खा. मंडलिक यांना देत असल्याचे सांगून वीरेंद्र मंडलिक यांनी कागल व मुरगुड नगरपालिका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका मंडलिक गट ताकतीने लढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
यावेळी मंडलिक कारखान्याचे आजी-माजी संचालक, पंचायत समिती सदस्यांसह जिल्हा परिषद सदस्या शिवानी भोसले, प्रकाश पाटील, मारुती काळुगडे, मसु पाटील, केशवकाका पाटील, संभाजी मोरे, जयसिंग भोसले, पांडुरंग भाट, बी. जी. पाटील, बालाजी फराकटे, आर. बी. पाटील, बाजीराव गोधडे, दत्ता सोनाळकर, रामचंद्र सांगले, नारायण मुसळे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. कोजिमाशी संचालकपदी निवड झाल्याबद्दल अविनाश चौगुले यांचा वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते सत्कार झाला. पं.स.सदस्य विश्वास कुराडे यांनी आभार मानले.