वादळाने पडलेले वडाचे झाड पुन्हा उभारले!

कोल्हापूर : कळंबा तलावाशेजारी वादळाने पडलेले वडाचे झाड पुन्हा नव्या जोमाने उभा राहिले. जेसीबीच्या साहाय्याने शेजारी खड्डा खणून, त्यामध्ये सेंद्रिय खत टाकून शास्त्रोक्त पद्धतीने झाडाला बळ मिळाले.

वृक्षप्रेमी, अभिनेते सयाजी शिंदे यांनी तत्परने लक्ष घालून यंत्रणा मार्गी लावली आणि त्यातून झाड उभारलं. अपघाती झाडांसाठी राज्यात हॉस्पीटल उभारले जावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तीन दिवसांपासून कोल्हापूर- गारगोटी मार्गावर वडाचे झाड उन्मळून पडलं होतं. अनेक वर्षांपासून उभं असणार हे वडाचं झाड पडलं असूनही दुर्लक्षित होतं. स्नेहल कदम यांनी सयाजी शिंदे यांना संपर्क साधून पडलेल्या झाडाबाबत सांगितले. त्यानंतर सयाजी शिंदे यांनी ‘सह्याद्री देवराई’चे व शिवराष्ट्र संस्थेचे प्रशांत साळुंखे यांना तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली आणि त्यातून जेसीबीसह सर्व यंत्रणा तत्परतेने उपस्थित राहून, काम जोमाने सुरू झाले. राधानगरी अर्बन फाऊंडेशनकडून जेसीबीसह मजूर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याठिकाणी फाऊंडेशनचे अध्यक्ष उत्तम जाधव आणि संतोष जाधव सक्रिय होते. पर्यावरणतज्ज्ञ सुहास वायंगणकर यांनी झाड उभारण्यासाठी प्रत्यक्ष मोलाचे मार्गदर्शन केले. सुनील कांबळे यांच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. झाडे उभारण्याच्या मोहिमेत घोडावत फाऊंडेशनचे सहकार्य लाभले.

झाड टेक्निकली उभा करण्यासाठी बाळासाहेब पानसरे, सचिन चांदणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी देवीचंद ओस्वाल, कळंबा ग्रामपंचायतचे सरपंच सागर भोगम, सुभाष पाटील पोलीस पाटील आदींचे सहकारी लाभले.