प्रयाग चिखली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली परिसरातील पूरस्थिती शुक्रवारी दिवसभरात जवळजवळ स्थिर झाली. पावसाचा जोर थोडा कमी झाल्याने शुक्रवारी सायंकाळपर्यंत पाण्याची वाढ अगदी संथ गतीने होत होती. त्यामुळे चिखली -आंबेवाडी ग्रामस्थांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
त्यामुळे उर्वरित लोकांच्या स्थलांतराच्या हालचाली थांबल्या आहेत हवामान अंदाजानुसार पाऊस आणि पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे ग्रामस्थांना रात्रभर हुरहुर लागली होती शुक्रवारी मात्र ग्रामस्थांनी सुटकेचा निस्वास सोडल्याचे चित्र होते
प्रयाग चिखली गावाला संपर्क करता येणाऱ्या चिखली ते पन्हाळा रोड आणि चिखली ते आंबेवाडी हे दोन्ही रस्ते अध्याप खुले आहेत. गुरुवारच्या पावसामुळे पाणी वाढून गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त होईल अशी स्थिती होती मात्र शुक्रवारी पाण्याची वाढ कमी झाली. क्षेत्र प्रयाग येथील दत्त मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे
येथील पाचही मंदिरे पाण्याखाली गेली आहेत मात्र प्रयाग येथील चिखली वरणगे रस्त्यावर पाणी आलेले नाही. अद्याप कोणत्याही प्रकारची गंभीर स्थिती निर्माण झालेली नाही. गावातील कोणत्याही घरामध्ये अद्याप पाणी आलेले नाही. गावामध्ये वैद्यकीय सेवा पशुसेवा पाणी सेवा व इतर शासकीय यंत्रणा योग्य ती दक्षता घेत आहेत. शेती वगळता गावातील सर्व दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू आहेत
चाऱ्याची टंचाई
प्रयाग चिखली दूध उत्पादकांची दुभती जनावरे सोनतळी येथे छोट्या मोठ्या छावणीमध्ये व राहत्या घरामध्ये बांधलेली आहेत शेती पाण्यामध्ये असल्यामुळे या जनावरांना चाऱ्याची टंचाई भासत आहे तरी सामाजिक संस्था संघटना तसेच शासकीय पातळीवर चारा उपलब्ध करून देण्याची उत्पादकांकडून मागणी होत आहे.