प्रयाग चिखलीतील मदतीपासून वंचित पूरग्रस्तांचा आंदोलनाचा इशारा

प्रयाग चिखली (वार्ताहर) : प्रयाग चिखली येथे २०१९ साली आलेल्या महापुरात घरांची पडझड झालेल्या १६१ पूरग्रस्तांना घर पडझडी बाबत प्रत्येकी ९५००० (पंच्यान्नव हजार) रुपयाचे अनुदान मंजूर झाल्याची यादी जाहीर झाली मात्र शासनाकडून त्यापैकी फक्त १०१ लोकांना अनुदान दिले. उर्वरित नुकसानग्रस्तांच्या बाबतीत शासनाच्या अधिकाऱ्यांनी चुकीचे निकष लावल्यामुळे घर पडलेल्या ६० लोकांना अनुदानापासून वंचित रहावे लागले आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करून नुकसानग्रस्त ६० पूरग्रस्तांना घर पडझडीचे पैसे मिळाले पाहिजेत अन्यथा पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित पूरग्रस्तांनी ग्रामपंचायत मध्ये घेतलेल्या बैठकीत दिला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. उमा संभाजी पाटील या होत्या. २०१९ साली प्रयाग चिखली गावामध्ये महापुराने हाहाकार माजवला. यावेळी शासनाकडून विविध स्तरावर मदत करण्यात आली यावेळी घरे पडलेल्या १६१ लोकांना प्रत्येकी ९५ हजार रुपये मदतीची घोषणा होऊन यादीही जाहीर झाली. मदत अनुदान आज मिळेल उद्या मिळेल असे करत तीन वर्षे उलटली आणि अनुदान वाटप करताना मात्र मंजूर यादी मधील साठ पूरग्रस्तांना यादीतून गहाळ करण्यात आले. या साठ लोकांना घरे पडल्या बाबत घर भाडे म्हणून प्रत्येकी २४ हजार रुपये अनुदानही त्यावेळी मिळाले होते. पूर्वीच्या निकषानुसार पात्र झालेल्या पूरग्रस्तांना कोणत्या निकषावर मंजूर यादीतून बाहेर काढले असा सवाल या नुकसानग्रस्त पूरग्रस्तांनी उपस्थित करून तीव्र असंतोष व्यक्त करत शासनाच्या अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवला.

यावेळी गोकुळचे संचालक एस. आर. पाटील यांनी या प्रकरणी ग्रामपंचायत प्रशासनाची कोणत्याही प्रकारची हयगय झालेली नाही, असे सांगत सरपंच आणि सदस्यही ६० नुकसानग्रस्त लोकांवरील अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर उतरतील, असे आश्वासन ही त्यांनी दिले.

दरम्यान यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी तत्कालीन ग्रामसेवक बी. व्ही. इंगवले यांनी गेल्या तीन वर्षात शासनाकडून आलेल्या परिपत्रकांबाबत माहिती न देता सदस्यांना अंधारात ठेवल्याचा आरोप केला. यादीतून नावे गहाळ केल्याबद्दल राजाराम पिसाळ, बाबासाहेब साळोखे, भूषण पाटील, धनराज यादव, राहुल कांबळे, दिलीप कांबळे, मानसिंग कांबळे, सनी आंबले, अरुण मांगलेकर, संपतराव दळवी नारायण कळके बाळासाहेब अष्टेकर, यांच्यासह गहाळ केलेल्या पूरग्रस्तांनी शासनाच्या कारभाराबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या.
यावेळी बैठकीत गदारोळ उडाला.
शेवटी सरपंच उमा संभाजी पाटील यांनी पूरग्रस्तांच्या वर झालेल्या अन्यायाबाबत तीव्र आंदोलन करण्याचे जाहीर केले. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

अंध व्यक्तीलाही वगळले
घराची पडझड झालेल्या दिलीप केरबा कांबळे या अंध पूरग्रस्ताला मदतीच्या यादीतून वगळल्याने ग्रामस्थात तीव्र भावना आहेत

🤙 9921334545