प्रतिपंढरपूर नंदवाळ येथे विठुनामाचा गजर !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ (ता.करवीर) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आज (रविवारी) भक्तिपूर्ण वातावरणात आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न झाला. विठुनामाचा गजर करत जिल्ह्यातील पाचशेहून अधिक दिंड्या आषाढी वारीत सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे विठुनामाच्या गजराने नंदवाळ परिसर दुमदुमून गेला होता. दरम्यान, पुईखडी टेकडी येथे रिंगण सोहळा पार पडला.

आषाढी एकादशीनिमित्त नंदवाळ येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. वाहतूक व्यवस्था व कडेकोट बंदोबस्तासह भाविकांची काळजी घेण्यासाठी प्रशासन सज्ज होते. नंदवाळ ग्रामपंचायत, तालीम, तरुण मंडळे आणि ग्रामस्थांनी उत्साहाने वारकरी व भाविकांचे स्वागत केले.

पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, महावितरण विभाग, अग्निशमन दल, प्रशासकीय अधिकारी व जिल्ह्यातील कर्मचारी भाविकांच्या सेवेसाठी तैनात होते. संस्था, कार्यकर्ते यांच्या वतीने भाविकांच्या स्वागताचे फलक उभारण्यात आले होते.