कोल्हापूर (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वी स्वतःला कोल्हापूर जिल्ह्याचे मालकमंत्री समजणारे आणि आता माजी मंत्री झालेले त्यांच्या नेहमीच्या सवयीने विरोधकांनी खोडा घातला नाही, तर या दिवाळीला थेट पाईपलाईनचे पाणी अभ्यंग स्नानाला देवू असे बोलले आहेत. सत्ता गेली, मंत्रिपद गेलं आत्तातरी त्यांनी खोट बोलण थांबवावं असा टोला भारतीत जनात पक्षाने माजी मंत्री आ.हसन मुश्रीफ यांना परिपत्रकाद्वारे लगावला.

जिल्ह्याचे दोन्ही माजी मंत्री गेली ७ वर्षे रखडलेल्या थेट पाईपलाईन प्रकल्पाबाबत खोट बोलत आहेत. मुळातच चुकीच्या संकल्पनेवर आधारलेला, चुकीच्या पद्धतीने काम सुरू केलेला आणि केवळ जनतेची दिशाभूल करून भ्रष्टाचार करण्यासाठी गडबडीने मंजूर केलेल्या या प्रकल्पासंदर्भात भाजपने वारंवार प्रशासनास आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांना यातील धोक्यांबाबत आणि प्रकल्प कमी खर्चात दीर्घ चालावा यासाठी करावयाच्या सुधारणांबाबत वारंवार सूचित केले होते. परंतु, सत्तेच्या गुर्मीत असणाऱ्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी आणि त्यांच्या दबावाखाली त्यांच्या सोईने काम करणाऱ्या प्रशासनाने या धोक्यांकडे आणि सुचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळेच हा प्रकल्प लांबत चालला असून याला पूर्ण जबाबदार कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आहे.
भारतीय जनता पार्टीने या प्रकल्पाची आवश्यकता जाणून हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू होवून, कमी खर्चात दीर्घकाळ चालवा यासाठी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामकाजात भाजपा खोडा घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, याउलट गेल्या अडीच वर्षात हातात पूर्ण सत्ता असताना सुद्धा प्रकल्पाचे काम समाधानकारक स्थितीत नेवू न शकलेले मुश्रीफ आता हा प्रकल्प रखडावा यासाठी विरोधक म्हणून त्यांच्या नवीन भूमिकेतून या प्रकल्पाला आडकाठी करणार असे त्यांना सुचवावयाचे आहे काय? असा सवालही भाजपाने या पत्रकातून केला आहे.