सावंतवाडी : आमदार, खासदार यांना न भेटणे, मंत्र्यांना तासनतास ताटकळत उभे करणे यामुळेच ठाकरेंविरोधात रोष निर्माण झाला. यामुळेच त्यांचे आमदार फुटले. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामुळेच शिवसेना संपली असून आता शिवसेना पुन्हा उभी राहणार नाही, अशी बोचरी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली.

राणे म्हणाले, संजय राऊत यांनी शिवसेनेला मागे नेण्याचे काम केले आहे. ठाकरेंना मातोश्री दिसायचे आणि राणेंना टार्गेट करायचं, एवढंच काम मुख्यमंत्र्यांना होतं. म्हणूनच हे सरकार कोसळले. आता महाराष्ट्र विकासाकडे वाटचाल करत आहे. नवनवीन प्रकल्प राज्यात येतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हेच चांगलं काम करतील, असा विश्वास आहे. महाराष्ट्रात सतत सरकार कोसळत राहिले तर विकास कसा होणार, हे राज्याच्या हिताचे नाही. त्यामुळे शरद पवार यांनी कधी तरी चांगले बोलावे, असा टोलाही लगावला.