शिक्षक बँकेत सत्तांतर; राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडीचा दणदणीत विजय; सत्ताधारी वरूटे पॅनलचा धुव्वा

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीत सत्तांतर झाले. थोरात गटाच्या शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील, समितीचे नेते जोतिराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीने १७ पैकी १७ जागा जिंकत सत्ताधारी राजाराम वरूटे यांच्या पॅनेलचा धुव्वा उडवला. या निवडणुकीत प्रसाद पाटील यांच्या पॅनललाही पराभवाचा सामना करावा लागला.

शिक्षक बँकेच्या निवडणुकीत चुरशीची तिरंगी लढत झाली. बँकेच्या १७ जागांसाठी ५६ उमेदवार रिंगणात होते. शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघ सत्तारूढ पॅनेल, पुरोगामी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘आप’लं पुरोगामी- समविचारी परिवर्तन पॅनेल तर थोरात गटाच्या शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील, समितीचे नेते जोतिराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडी या पॅनेलमध्ये लढत झाली.प्रचार काळात आरोप- प्रत्यारोप, शह-काटशाहाचे राजकारण झाले आहे. तिन्ही पॅनेलने थेट शिक्षक सभासदांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक तालुक्यात शिक्षक मेळावे घेऊन भूमिका मांडली. 

 राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीने १७ पैकी १७ जागा जिंकून शिक्षकांच्या बँकेवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. गेल्या अनेक वर्षापासून वरुटे गटाची सत्ता या बँकेवर होती. वरूटे गटावर भ्रष्टाचाराचे तसेच अनियमित व्यवहाराबद्दल आरोप केले जात होते. या पॅनेलमधील शाहूवाडी तालुक्यातील शिवाजी रोडे पाटील प्रथमपासूनच आघाडीवर राहिले. त्यांनी पॅनल मजबूत करण्यासाठी खूप कष्ट घेतले होते. त्यांचे सहकारी सर्जेराव काळे, शिवाजी पाटील यांनी शिवाजी रोडे पाटील यांच्याबरोबर संपूर्ण पॅनेलच्या प्रचारासाठी अहोरात्र कष्ट घेतले.

 निकालानंतर राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीने मोठा जल्लोष केला.

विजयी उमेदवार :

सर्वसाधारण गट : करवीर- सातापा पाटील, पन्हाळा- अमर वरुटे, शाहुवाडी- शिवाजी रोडे- पाटील, हातकणंगले- अर्जुन पाटील, शिरोळ- सुनील शेळके, राधानगरी- राजेंद्रकुमार पाटील, भुदरगड- बाळकृष्ण हळदकर, कागल- बाळासाहेब निंबाळकर, गडहिंग्लज- नंदकुमार वाईंगडे, गगनबावडा- गजानन कांबळे, आजरा- शिवाजी बोलके, चंदगड- बाबू परीट.

इतर मागासवर्गीय : रामदास झेंडे

 भटक्या व विमुक्त जाती : सुरेश कोळी

 अनुसूचित जाती-जमाती : गौतम वर्धन

महिला गट:  वर्षा केनवडे, पद्मजा मेढे