मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. १६४ मते शिंदे सरकारला मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बहुमत चाचणी जिंकली. भाजपचे ज्येष्ठ आमदार माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी शिंदे सरकारच्या बहुमताचा प्रस्ताव विधानसभेत मांडला. सरकारच्या विरोधात ९९ जणांची मतदान केले.
सपाचे आबू आझमी आणि रइस शेख तसेच एमआयएमचे फारूख अन्वर हे सदस्य तटस्थ राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुरुंगात असल्याने ते बहुमत चाचणीला उपस्थित नव्हते. विश्वासदर्शक ठरावाला २० आमदार अनुपस्थित होते.
सकाळी ११ वाजता सुरु झालेल्या बहुमत चाचणीच्या अधिवेशनाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह किमान चार आमदार अनुपस्थितीत होते. त्यामुळे तेही बहुमत चाचणीला मुकले. अशोक चव्हाण यांच्यासह विजय वडेट्टीवार, संग्राम जगातप, अण्णा बनसोडे हे विधानसभा सदस्य ११ वाजल्यानंतर विधिमंडळ परिसरात आल्याने विधानसभेत पोहोचू शकले नाहीत.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले जालना जिल्ह्यातील आमदार संतोष बांगर हे सोमवारी सकाळी एकनाथ शिंदे गटात सामिल झाल्याने शिवसेनेतून फुटून वेगळा गट स्थापन करणाऱ्या आमदारांची संख्या ४० झाली आहे. रविवारी झालेल्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना १६४ तर, राजन साळवी यांना १०७ मते पडली. तर, तीन आमदार तटस्थ राहिले होते. शिवसेनेच्या ४० आमदारांनी शिंदे सरकारच्या बाजूने मतदान केलं तर उर्वरित १५ आमदारांनी प्रस्तावाविरोधात मतदान केले.