बहिरेश्वर (प्रतिनिधी) : ‘शिवराज्याभिषेकाचे तैलचित्र काढणारी देशातील पहिली महिला म्हणून कोल्हापूरातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ . अल्पना चौगुले यांचा तामिळनाडू शासनाने तंजावर येथे सत्कार केला.
तंजावर ( तामिळनाडू ) येथील सरस्वती महलमध्ये छ.राजे सरफोजी दुसरे यांचा २२५ वा राज्याभिषेक मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. तामिळनाडू शासन व तंजावर येथील भोसले सरकार यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.अल्पना चौगुले यांनी इतिहासाचा सखोल अभ्यास करून अतिशय सुंदर, अभ्यासपूर्ण असे जलरंगामध्ये ‘शिवराज्याभिषेक’ हे चित्र रेखाटले होते. शिवराज्याभिषेकाचे छायाचित्र रेखाटणारी, देशातील पहिली महिला म्हणून तंजावर येथील सध्याचे राजे छ. शिवाजी महाराज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांना शिवराज्याभिषेक पेंटिंगच्या प्रति देऊन सत्कार केला व हे पेंटिंग घरोघरी जावे व आपल्या राज्यांचे विचार व गुण त्यानिमित्ताने सर्वांच्या पर्यंत पोहोचावेत अशी आशा शिवाजीराजे भोसले यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमामध्ये देशभरातील शासकीय अधिकारी , शहाजीराजे व शिवाजी राजे यांचे देशातील अनेक वारसदार व मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या मध्ये डॉ. सुंदर मूर्ति, व्हाईस चेअरमन सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तामिळ, चेन्नई, तंजावरचे राजे छत्रपती शिवाजी भोसले, कलेक्टर- थिरू एस.एस. पालनीमनीकम, थिरु अनबिल महेश पोया मोझी (युनियन एज्युकेशन मिनिस्टर), नागपूरचे राजे मुधोजी, कळवबिडचे राजे मोहिते, तंजावरचे राजेंचे अनेक वंशज, कोल्हापूरहून डॉ. सोपान चौगुले व अरुण जाधव उपस्थित होते. अलीकडेच डॉ. अल्पना चौगुले यांचा शिवराज्याभिषेक दिनी कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात कुलगुरूंनी सत्कार केला होता. त्याचप्रमाणे केंद्र शासनाने ही त्यांचा ‘नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवॉर्ड’ या वर्षीचा देऊन गौरव करण्यात आला होता.