सभासदांसमोर ‘आप’ल पुरोगामी परिवर्तन पॅनेलचाच एकमेव सक्षम पर्याय : पॅनेलप्रमुख शंकर पवार

शिरोळ : सत्तारूढ तसेच स्वाभिमानी पॅनेलचे प्रमुख नेते एकमेंकावर तोंडसुख घेत असून ते बॅंकेच्या भविष्यावर न बोलता चक्क दिशाभूल करीत आहेत. त्यांनी बँक वाचवण्यासाठी किंवा सभासद हितासाठी आजपर्यंत काहीही केलेले नसून बॅंक वाचविण्यासाठी गेल्या वीस वर्षांपासून प्रसाद पाटील तसेच पुरोगामी परिवाराने जो आजअखेर लढा दिलेला आहे. त्या संघर्षाची जाणीव ठेवल्याने सभासद विरोधी दोन्हीं पॅनेलच्या तुलनेत ‘आप’ल पुरोगामी समविचारी परिवर्तन पॅनेलचाच पर्याय स्विकारतील, यामध्ये तिळमात्र शंका नाही, असा विश्वास पॅनेल प्रमुख शंकर पवार यांनी व्यक्त केला.

शिक्षक बॅंकेच्या प्रचारार्थ शिरोळ तालुका प्रचार दौ-यादरम्यान ते बोलत होते.
पवार म्हणाले, सेवानिवृत्त पॅनेल प्रमुख तथा राज्याध्यक्ष राजाराम वरूटे दुसऱ्या पॅनेलप्रमुखांचे फौजदारी गुन्हे सभासदांसमोर मांडत आहेत. तर प्रत्युत्तरादाखल पॅनेलप्रमुख रवी कुमार पाटील राजाराम वरूटे यांच्या राज्याध्यक्ष पदावर व त्यांच्या काळातील तोट्यावर आगपाखड करीत आहेत. अशा परस्परांवरील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना बॅंकेतील तोट्याच्या व्यवहारामुळे सभासदांचे सन २००४ पासून होणाऱ्या लाखो रुपयांच्या नुकसानीकडे मात्र ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. शिवाय त्याची नैतिक जबाबदारीही हे दोन्हीही माजी चेअरमन स्विकारत नाहीत. ते चक्क सभासदांची अशाप्रकारे खुलेआम दिशाभूल करीत आहेत.
सन २००४ पासून सभासदांचे डिव्हिडंट तसेच व्याज रुपाने होणारे आर्थिक नुकसान सभासद जाणून आहे.तेंव्हा या दोन्हीही पॅनेलना त्यांची जागा दाखवून सभासदांसाठी प्रामाणिक तसेच अविरत लढा देणा-या पुरोगामी समविचारी परिवर्तन पॅनलकडे सूज्ञ सभासद शिक्षक बॅंकेची सर्व सूत्रे देणार याबाबत तिळमात्र शंका नाही असा ठाम विश्वास शंकर पवार यांनी व्यक्त केला.

प्रचार दौ-यात उमेदवार वैजनाथ दराडे, आनंदा शिंदे, शितल देमाण्णा, प्रकाश पाटील, दिगंबर वारके आदी पुरोगामी शिलेदार उपस्थित होते.