मलाही गुवाहाटीची ऑफर आली होती-संजय राऊत

नवी मुंबई (वृत्तसंस्था) : मलाही गुवाहाटीची ऑफर आली होती. मात्र, मी बाळासाहेबांना मानतो म्हणून गेलो नाही’. असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपा सरकारला लगावला आहे. ईडी नावाची तलवार शिवसेनेच्या आमदारांच्या मानेवर ठेवल्यामुळेच त्यांनी बंड केला असा आरोप देखील राऊत यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. शिंदे गटाकडून फसवणूक केली जात आहे. त्यांच्या मनात आपण आपल्या नेत्याला फसवल्याची खदखद असल्याचे राऊत म्हणाले. तसेच लोकांना फसवणे हा भाजपाची पद्धत आहे. त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडलेले लोकही भाजपासारखेच वागत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. भाजपाला शिवसेनेची मुंबईतील ताकद कमी करायची आहे त्यामुळे ते शिंदे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवतं असल्याचेही राऊत म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊत यांची सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शुक्रवारी सुमारे १० तास चौकशी केली.