विधानसभा अध्यक्षपदासाठी हे उमेदवार रिंगणात

नवी मुंबई (वृत्तसंस्था) : नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद रिक्त झाले होते. तेव्हापासून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळच अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत होते. उद्धव ठाकरे सरकारने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची राज्यपालांना विनंती केली होती. मात्र, राज्यपालांनी ही विनंती मान्य केली नव्हती.

आता महाविकास आघाडी सरकार पडून शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला वेग आला आहे. या संदर्भात विधिमंडळ सचिवालयाकडून परीपत्रक जारी करण्यात आले आहे. ३ जुलै रोजी होणाऱ्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपा आणि महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.भाजपाकडून सुरुवातील उमेदवारीसाठी राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव चर्चेत होते. मात्र, भाजपाच्या बैठकीनंतर राहुल नार्वेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.