कोल्हापूर : आपल्या घराचा वापर अवैध धंद्यासाठी करून देणाऱ्या स्वयंघोषित नेत्याच्या हातात शिक्षक बँकेची सत्ता देणार का?असा परखड सवाल शिक्षक संघाच्या सत्ताधारी पॅनेलचे प्रमुख व शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरूटे यांनी केला.
कोतोली फाटा- केर्ले येथे पन्हाळा तालुक्यातील शिक्षक संघाच्या सत्तारूढ पॅनेलच्या प्रचारासाठी आयोजित शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुकाणू समितीचे सदस्य शिवाजीराव पाटील होते.
वरुटे पुढे म्हणाले, शिरोळ तालुक्यातील स्वयंघोषित शिक्षक नेत्यांने आपल्या घराचा वापर अवैध धंद्यासाठी केला. त्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हेही नोंद झाले आहेत. शिक्षकी पेशाला कलंक असणाऱ्या या नेत्याच्या हातात शिक्षकांची आर्थिक मातृसंस्था असलेल्या बँकेचा कारभार सुज्ञ सभासद कधीही देणार नाहीत. निवडणुकीत विरोधी पॅनेलना सभासद थारा देणार नाहीत. शिक्षक संघाने जिल्हा परिषद व राज्यस्तरावर सतत पाठपुरावा करून, प्रयत्नांची पराकाष्टा करून शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे शिक्षक संघावरच सभासदांचा, शिक्षकांचा मोठा विश्वास आहे.या विश्वासामुळेच सत्तारूढ पॅनल भक्कम झाले आहे. प्रचार काळात सर्व तालुक्यात सभासदांचा मोठा उस्फुर्त पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे सत्तारूढ पॅनलचे सर्वही उमेदवार मताधिक्याने विजय होतील. सत्तारूढ गट विजयाची हॅटट्रिक करणारच.
शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी बापट म्हणाले, शिरोळ मधील आघाडी प्रमुख हा सहकाराचे खोटे तत्त्वज्ञान सांगत सुटला आहे.सन 2008-09 मध्ये बँकेचे तत्कालीन चेअरमन रवीकुमार पाटील होते. या काळात शिक्षक बँक एक कोटी 69 लाख रुपये तोट्यात होती. बँक तोट्यात असतानाही कर्मचाऱ्यांना बोनस दिला. हा बोनस देण्यामागचे ‘अर्थ’कारण सर्वांना माहीत आहे. त्यामुळे अशा नेतृत्वाच्या हातात बँकेची सत्ता सभासद कधीही देणार नाहीत.
शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णात धनवडे यांनी बँकेतील प्रगतीचे कौतुक करून ते म्हणाले, सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी इतिहासात प्रथमच सर्व केडरच्या संचालकांना चेअरमनपदाची संधी दिली. एवढेच नाही तर विद्यमान संचालकानी नव्या चेहऱ्यांना संधी देऊन आपल्या कार्यकर्त्याला संधी देण्याचा नवा आदर्श घालून दिला आहे.
पन्हाळा तालुक्यातील उमेदवार बबन केकरे व काशिनाथ कुंभार यांनी सत्तारूढ गटाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी सुकाणू समिती सदस्य दिलीप बच्चे, संदीप पाडळकर, नागेश शिनगारे,श्वेता खांडेकर, उत्तम पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.
बँकेचे अध्यक्ष बाजीराव कांबळे, उपाध्यक्ष बजरंग लगारे, संचालिका स्मिता डिग्रजे, उमेदवार मारुती दिंडे, बाबा साळोखे, लता नायकवडे, संजय ठाणेकर, निवास पाटील, राम पाटील, बाळासाहेब पाटील, जयसिंग पाटील, सरदार शेवाळे, सुमन पोवार, महानंदा पाटील आदी उपस्थित होते.